First Indian Pharmaceutical Company - प्रथम भारतीय औषधी कंपनी​

First Indian Pharmaceutical Company-प्रथम भारतीय औषधी कंपनी​

प्रथम भारतीय औषधी कंपनी (First Indian Pharmaceutical Company) म्हणजे बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल वर्क्स लिमिटेड (BCPW) आणि जिचे सध्याचे नाव बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल लिमिटेड [Bengal Chemicals & Pharmaceuticals Ltd. (BCPL)] ची स्थापना 1901 मध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांनी केली. स्वावलंबी होण्यासाठी व भारतीयांच्या मनात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने स्वदेशी तंत्रज्ञानासह दर्जेदार औषधे, रसायने आणि घरगुती उत्पादनांचे उत्पादन करणारी ही पहिली भारतीय कंपनी आहे.
औषधांच्या सुरुवातीच्या उपक्रमापासून कंपनीने हळूहळू उत्पादनांच्या विस्तृत श्रेणींमध्ये विस्तार केला आणि त्यात विविधता आणली. औद्योगिक रसायने (Industrial Chemicals), मोठ्या प्रमाणातील औषधे (Bulk Drugs/ Chemicals), सुगंधी द्रव्य (Perfumeries), सौंदर्य प्रसाधने (Cosmetics), प्रसाधनगृहे (Toiletries), रुग्णालय आणि शस्त्रक्रिया उपकरणे (Surgical Equipment), अग्निशामक उपकरणे (Fire Extinguishers) इ. उत्पादने होती, जे की त्याच्या रासायनिक आणि औषधी उत्पादनांच्या श्रेणीचे एकत्रीकरण होते.
1950 पर्यंत ते नेहमीच गुणवत्तेत उत्कृष्टतेसाठी (Quality Excellence) प्रयत्नशील होते आणि तंत्रज्ञानात (Technology) नेतृत्व राखले होते. परंतु 60 च्या दशकात कंपनीचे तंत्रज्ञान नेतृत्व कमी झाले आणि 1970 मध्ये कंपनी आजारी पडली. पुढे डिसेंबर 1980 मध्ये कंपनीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल लिमिटेड (BCPL) चे चार कारखाने आहेत ज्यापैकी दोन कोलकात्यात, एक मुंबईत आणि एक कानपूरमध्ये आहेत.

आचार्य प्रफुल्ल चंद्र रे

आचार्य प्रफुल्ल चंद्र रे

आचार्य प्रफुल्ल चंद्र रे हेभारतीय रसायनाचे जनकम्हणून ओळखले जातात. प्रफुल्ल चंद्र रे एक सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ शिक्षक आणि पहिले आधुनिक भारतीय रासायनिक संशोधकांपैकी एक होते. त्यांनी 1896 मध्ये स्थिर रासायनिक कंपाऊंड मर्क्युरस नायट्रेट ( stable compound mercurous nitrite) चा शोध लावला. प्रफुल्ल चंद्र रे यांनी 1901 मध्ये भारताची पहिली औषध कंपनी म्हणजे बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल वर्क्स लिमिटेड (BCPW) स्थापित केली. ते एक अतिशय भावनिक आणि समर्पित भावनेने प्रेरित झालेले सामाजिक कार्यकर्ते देखील होते ज्यांनी कधीही जातीपातीचे (Caste system) समर्थन केले नाही.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण: प्रफुल्ल चंद्र रे यांचा जन्म 2 ऑगस्ट 1861 रोजी आताच्या बांगलादेशातील रारुलीकटिपारा गावात झाला. प्रफुल्ल चंद्र रे हे दोन भावांमध्ये धाकटे होते. त्यांचे वडील हरीश चंद्र रे हे जमीनदार होते ज्यांना शिकण्याची आवड होती म्हणुन त्यांनी त्यांच्या घरात एक विस्तृत ग्रंथालय बांधले होते. प्रफुल्ल यांच्या आई भुवनमोहिनी देवी उदारमतवादी विचारांच्या सुशिक्षित होत्या.
प्रफुल्ल नऊ वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब कोलकात्याला राहायला गेले आणि त्यांनी हेअर स्कूलमध्ये प्रवेश घेतला. दुर्दैवाने, प्रफुल्ल तिथे आजारी पडले आणि 1874 मध्ये ते आपल्या गावी परतले. प्रफुल्ल यांना बरे होण्यासाठी दोन वर्षे लागली परंतु पचनाची आणि निद्रानाशाची समस्या कायम स्वरूपी मागे लागली. या काळात त्यांनी वडिलांच्या सुसज्ज ग्रंथालया मध्ये वाचनाचा आनंद घेतला.
ते पुन्हा कोलकाता येथे परतले आणि त्यांनी अल्बर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर 1879 मध्ये प्रवेश परीक्षा (Entrance test) उतीर्ण करून मेट्रोपॉलिटन कॉलेज (आताचे विद्यासागर कॉलेज) येथे शिक्षण सुरू केले. प्रफुल्ल यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये रसायनशास्त्राचाही अभ्यास केला आणि लवकरच हा त्यांचा आवडता विषय बनला; त्यांनी घरी प्रयोगशाळा सुद्धा बांधली आणि प्रयोग करायला सुरुवात केली
1882 मध्ये, प्रफुल्ल चंद्र रे यांनी एडिनबर्ग विद्यापीठ (इंग्लंड) येथे शिष्यवृत्ती मिळविली आणि 1885 मध्ये त्यांनी तेथे पदवी प्राप्त केली. एडिनबर्ग येथे त्यांना संशोधन करण्यासाठी 1887 मध्ये त्यांना डी. एससी. ही पदवी दिली गेली तसेचकॉपरमॅग्नेशियम ग्रुपचे संयुग्मित सल्फेट्स: समरूपी मिश्रणे आणि रेणु संयोजनांचा अभ्यास (Conjugated Sulphates of the Copper-Magnesium Group: A Study of Isomorphous Mixtures and Molecular Combinations) या विषयावरील त्यांच्या प्रबंधासाठीहोप प्राइजदेण्यात आला.

प्रफुल्ल चंद्र रे यांचे योगदान आणि यश:
1888 मध्ये प्रफुल्ल चंद्र रे कोलकत्याला परतले आणि 1889 मध्ये कोलकता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये रसायनशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक म्हणुन रुजु झाले. त्यांनी एक संशोधन प्रयोगशाळा स्थापन केली आणि हळूहळू त्यांच्यासोबत संशोधन करणारे समर्पित विद्यार्थी गोळा होत गेले.
त्यांनी त्यांच्या हयातीत सुमारे 150 शोधनिबंध प्रकाशित केले. विज्ञानावरील त्यांचे अनेक लेख हे त्यांच्या काळातील नामवंत जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले. त्यांच्या संशोधनात 1896 मध्ये स्थिर रासायनिक कंपाऊंड मर्क्युरस नायट्रेट (stable compound mercurous nitrite) चा शोध होता जो की त्यांना नाइट्राइट आणि हायपोनाइट्राइट संयुगे आणि त्यांच्या संयुगांचा अभ्यास करताना आढळला. तसेच प्रफुल्ल चंद्र रे यांनी सल्फर, दुहेरी मीठ, होमोमॉर्फिज्म आणि फ्लोरिनेशन असलेल्या सेंद्रिय संयुगांवरही संशोधन केले.
1892 मध्ये 700 रुपयांच्या अल्प भांडवलाने त्यांनी बंगाल केमिकल वर्क्स ची स्थापना केली. त्यांच्या व्यवस्थापनाखाली त्याची भरभराट झाली. कंपनीने सुरुवातीला हर्बल उत्पादने आणि स्वदेशी औषधांची निर्मिती केली. 1901 मध्ये हा उदयोग एक मर्यादित कंपनी बनली जिचे नाव बंगाल केमिकल अँड फार्मास्युटिकल वर्क्स लिमिटेड (BCPW) आणि भारतातील पहिली औषधी कंपनी बनली. हळूहळू, कंपनी विस्तारत गेली आणि एक आघाडीची रसायने आणि औषध उत्पादक बनली.
प्रफुल्ल चंद्र रे यांना प्राचीन ग्रंथांमध्ये रस होता आणि त्यांनी मोठ्या संशोधनानंतर 1902 आणि 1908 मध्ये “द हिस्ट्री ऑफ हिंदू केमिस्ट्री” हा ग्रंथ दोन खंडांमध्ये प्रकाशित केला. या ग्रंथात प्राचीन भारतातील धातूविज्ञान आणि वैद्यकशास्त्राच्या विस्तृत ज्ञानाची माहिती देण्यात आली.
1916 मध्ये प्रफुल्ल चंद्र रे प्रेसिडेंट कॉलेजमधून निवृत्त झाले आणि कोलकता विद्यापीठात दाखल झाले जिथे त्यांनी 20 वर्षांहून अधिक काळ काम केले.
त्यांनी अनेक भारतीय विद्यापीठांचे आंतरराष्ट्रीय परिसंवाद आणि काँग्रेसमध्ये प्रतिनिधित्व केले. 1920 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.
1932 आणि 1935 मध्ये दोन खंडांमध्ये प्रकाशित झालेले त्यांचे आत्मचरित्र “लाइफ अँड एक्स्पिरिअन्स ऑफ अ बंगाली केमिस्ट” हे शास्त्रज्ञ म्हणून त्यांच्या स्वत:च्या प्रेरणा आणि त्यांच्या हयातीत भारताने अनुभवलेल्या व्यापक बदलांचे दस्तऐवज आहे.
प्रफुल्ल चंद्र रे यांना विज्ञानाच्या चमत्कारांचा उपयोग जनतेचे जिवनमान उंचावण्यासाठी साठी करायचा होता. ते एक अतिशय उत्कट आणि समर्पित सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी 1920 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात दुष्काळ आणि पूरग्रस्त लोकांना मदत करण्यात उत्सुकतेने आणि सक्रियपणे भाग घेतला आणि त्यांनी खादी सामुग्रीला देखील प्रोत्साहन दिले. प्रफुल्ल चंद्र रे यांनी बंगाल एनॅमल वर्क्स, नॅशनल टॅनरी वर्क्स आणि कलकत्ता पॉटरी वर्क्स यांसारखे इतर अनेक उद्योग स्थापित करण्यास मोलाची भुमिका वठवली. प्रफुल्ल चंद्र रे हे खरे बुद्धिवादी होते आणि ते पूर्णपणे जातिव्यवस्था आणि इतर अतार्किक समाजव्यवस्थेच्या विरुद्ध होते. समाजसुधारणेचे हे कार्य त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अविरतपणे सुरू ठेवले.
आयुष्यभर अविवाहित राहून, प्रफुल्ल चंद्र रे 1936 मध्ये 75 व्या वर्षी प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. 16 जून 1944 रोजी वयाच्या 82 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

Top